हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकार कडून महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील सुमारे 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच यावेळी पदोन्नती देण्यात आलेल्या 143 पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदली व पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची बदली पोलीस उपाधीक्षक म्हणून कोल्हापूर येथे झाले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील हे कराडमध्ये अतिशय आदराने घेतलं जाणारे नाव आहे. आज इतर अधिकाऱ्यांसह त्यांचीही बदली करण्यात आली आहे. बी. आर. पाटील यांची बदली आता कोल्हापूर ला झाल्यानंतर त्यांच्या जागी आता कराड शहर पोलीस ठाण्याचा पदभार कोणाच्या खांद्यावर पडणार हे मात्र, अद्याप जाहीर झाले नाही. मात्र संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष्य लागलं आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून बाळासाहेब यशवंत भालचिम तर पोलीस मुख्यालय सातारा येथे राजेंद्र धैर्यशील शेळके यांना पदोन्नती देण्यात आली.
जनमाणसात मिसळणारा आणि सर्वाना आपला माणूस वाटणारा अधिकारी म्हणजे बी. आर. पाटील
कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराड शहरात दोनवेळी सेवा बजावली आहे. यातील त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये कुख्यात गुंड सलीम उर्फ सल्या चेप्या यांच्या काळात कराड शहर आणि आसपासची गुंडगिरी मोडून काढण्यात त्यांनी यश मिळवलं. कराड शहरातील गुन्हेगारी वर त्यांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवत गुन्हेगारीला आळा घातला होता. याशिवाय लोकांच्यात मिसळणारा, कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणारा पोलीस अधिकारी म्हणून बी. आर. पाटील यांची चांगलीच ओळख आहे.