व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड एसटी कर्मचाऱ्यांची पदयात्रा : स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ ते मुंबई उद्या प्रस्थान

कराड | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी येथील प्रीतिसंगमवरून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत कराड आगारातील एसटी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. त्यानुसार उद्या गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून या पदयात्रेचे मुंबईकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी राज्यभरासह कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला. तसेच कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पगारवाढ देत एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीला बगल दिली आहे. मात्र, विलीनीकरणाच्या लढ्यात आत्तापर्यंत राज्यभरातील जवळपास 65 एसटी कर्मचारी हुतात्मा झाले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय एसटी कर्मचारी बेमुदत संप मागे घेणार नाहीत.  विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी कराड आगारामधील एसटी कर्मचारी प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता प्रीतिसंगमावरून या पदयात्रेस सुरुवात करण्यात येणार असून ही पदयात्रा आठ ते दहा मुक्कामांनंतर अंदाजे 16 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकेल, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या प्रसिद्धीपत्रकावर पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांच्यासह चालक डी.ए. पवार, चालक जावेद मुल्ला, वाहक संजय लावंड आणि चालक सुहास शिवदास यांची नावे व सह्या आहेत. या अर्जाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुख, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, रा.प. विभाग नियंत्रक सातारा, पोलीस निरीक्षक कराड, तहसीलदार आणि प्रांताधिकारी कराड यांना देण्यात आल्या आहेत.