कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत, तसेच वीजदरवाढी विरोधात कराड तहसीलदार आणि महावितरणच्या कार्यालयावर उद्या बुधवारी (ता. 18) भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून सकाळी 10 वाजता या मोर्चाचा प्रारंभ केला जाणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून जगभरातील नागरिकांवर कोरोनाचे मोठे संकट घोंगावत आहे. त्यामुळे जनजीवन प्रचंड प्रमाणात विस्कळित झाले आहे. राज्य शासनाच्या निर्बंधामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यातच गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे तर शेतकरी व सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या, पण त्याची अंमलबजावणी मात्र शून्य आहे. अशा स्थितीत राज्य शासनाला जाग आणण्यासाठी या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून सकाळी 10 वाजता या मोर्चाचा प्रारंभ होणार असून, शाहू चौक, दत्त चौक मार्गे महावितरण कार्यालयात निवेदन सादर केले जाईल. त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये शेतकरी व सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.