कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
कराड-विटा मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा मार्ग गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. या मार्गावरील कृष्णा नाका परिसरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे काहीकाळ या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. सैदापूर हद्दीत असणारा कराड विटा हा रस्ता अनेक वर्षांपासून पाण्याखाली जातो. या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला कि, मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचत असते.
सैदापूर हद्दीत असणारा कराड-विटा रस्ता हा पावसाळ्यात खूप अडचणीचा ठरत आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचत असल्यामुळे परिसरातील रहिवाशांना आणि दुकानदारांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागते. सध्या या ठिकाणी पावसाचे पाणी कराड विटा रस्त्याच्या पाठीमागील शेतात साचत असल्याने ते रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्ता पाण्याखाली गेला आहे.
कराड-विटा मार्गावर कराड शहर व सैदापूर दरम्यान असलेल्या नवीन कृष्णा पुलाचे काम अंतिम टप्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा वाढता ताण, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे नवीन कृष्णा पुलावरही वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
कराड-विटा मार्गाच्या या रस्त्यावरून कराड-वडूज, सैदापूर येथील विविध शाळा, महाविद्यालय व कराड-मसूर मार्गावरील वाहतुकीचीही मोठी भर पडते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. दरवर्षी पडणाऱ्या अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे या ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्यांवरील खडी वरती आली आहे.




