सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
देशात पहिल्या क्रमांकावर आलेल्या कराड नगरपालिकेच्या घरकुल इमारतीमध्येच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गैरसोयीने इमारतीची दैन्यावस्था झाली आहे. मागणी करुनही दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने येथील महिलांनी बोंबाबोंब केली असून मुख्याधिकारी कामाकडे लक्ष देत नसल्याने स्थानिक नगरसेवकही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
कराड नगरपालिकेने शहरातच दिलेल्या 253 आरसीसी नवीन घरांची दैनावस्था झाली आहे. याची दुरुस्ती करण्याच्या मागणीकडे गेल्या अनेक दिवसांपासून कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे करण्यात आली आहे. डांगे मात्र याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी या घरकुलामध्ये राहणाऱ्या महिलांनी मुख्याधिकारी डांगे यांच्या नावाने आज बोंब मारत आंदोलन केलं. या ठिकाणचे स्थानिक नगरसेवकही आता राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत.
पालिकेने दिलेल्या घरकुलांची पाहणी केली असता या ठिकाणी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं आणि ड्रेनेजचं पाणी एकत्रच मिसळत असून पाण्याच्या पाईपचीही अनेक ठिकाणी मोडतोड झाली आहे. याच ठिकाणी भयंकर अस्वच्छता असुन कचऱ्याचे ढीगसुद्धा साठल्याचं पाहायला मिळत आहे. दरवाजे, सांडपाणी तसेच नवीन आरसीसीच्या इमारतीच्या छताचे अनेक तुकडे पडले असुन इमारत राहण्यायोग्य नसल्याचं समोर आलं आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कराड नगरपालिकेला या ठिकाणच्या गैरसोय आणि स्वच्छतेबाबत काही देणेघेणे नसल्याचं समोर आलं आहे.