कराडला देशातील पहिला ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय’ प्रोजेक्ट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कचर्‍याच्या समस्येबरोबर दुर्गंधीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. खत तयार करून कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी दुर्गंधी, रोगराई व ग्रीन हाऊस वायू या समस्या कायम आहेत. यावर उपाय म्हणून अद्रिशा बायोलॉजिक व पालिकेच्यावतीने देशातील पहिला ब्लॅक सोल्जर फ्लॉय (बीएसएफ) प्रोजेक्ट कराडला राबविण्यात येत आहे. यातून शहरातील दररोज सुमारे साडे सात टन कचर्‍याचे विघटन केले जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर दररोज एक टन कचर्‍याचे विघटनाचे काम सुरू असल्याची माहिती अद्रिशा बायोलॉजिकचे संचालक डॉ. चारूदत्त आपटे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आद्रिशा बायोलॉजिकचे सुधीर एकांडे उपस्थित होते. डॉ. आपटे म्हणाले, ब्लॅक सोल्जर फ्लाय ही माशी आपल्या घरामध्ये जशी माशी आढळते त्याच वंशातली आहे. घरात आढळणार्‍या माशीचे पंख पारदर्शक असतात त्यांना रंग नसतो तिचे डोके काळपट तांबडे असते तर ब्लॅक सोल्जर फ्लाय माशीचा रंग पूर्णपणे काळा असतो. त्यामुळे तिला ब्लॅक सोल्जर फ्लाय म्हणतात. ही माशी तिच्या सात दिवसाच्या आयुष्यात फक्त अर्धा थेंब पाणी पिते. या अळीचे पंधरा दिवसात दहा ते शंभर मिलनीपर्यंत वजन वाढते ही अळी आपल्या वजनाच्या दीडपट कचरा फस्ते करते. सर्व सेंद्रीय पदार्थ, मलमुत्र, सर्व प्रकारचा ओला कचिरा हे हिचे खाद्य आहे. या अळीची विष्टा तपकिरी रंगाची असते यात भरपूर जीवन द्रव्ये असतात. तसेच रोग प्रतिकार शकत्ी असते याला फ्रॉक्स म्हणतात हे शेतीला खत म्हणून वापरले जाते. याचबरोबर या आळ्या कोंबडी व माशांचे उत्तम खाद्य म्हणून वापरल्या जातात.  ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय’ (बीएसएफ) अळीला हा कचरा खायला दिला तर दिवसभरात दहा हजार आळ्या एक टन कचरा खातात तसेच दुर्गंधी, ग्रीन हाऊस वायूची समस्या तयार होत नाही.

सुधीर एकांडे म्हणाले, अद्रिशा बायोलॉजिक व कराड पालिकेच्यावतीने कचरा विघटनासाठी ब्लॅक सोल्जर फ्लॉय हा प्रोजक्ट प्रायोगिक तत्वावर सध्या सुरू करण्यात आला आहे. दररोज एक टन कचर्‍याचे विघटना सध्या करण्यात येत आहे. मात्र शहरामध्ये दररोज सुमारे साडे सात टन कचरा गोळा होत असल्याने येणार्‍या काही महिन्यात याची व्याप्ती वाढवून दररोजचा गोळा होणारा सर्व ओला कचरा या प्रकल्पाच्या माध्यमातून विघटन केला जाणार आहे. देशातील पहिलाच प्रोजेक्ट हा कराडमध्ये राबविला जात असल्याने याची उत्सुकता मोठी आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 50 हून अधिक लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे.