कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने दुसऱ्या लाटेतही पूर्ण केले कोरोनामुक्तीचे सहस्त्रक

Krishna Hospital Karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ११०० हून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त करत, कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण केले आहे. आजअखेर एकूण ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश प्राप्त झाले असून, कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे १८ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आजअखेर कृष्णा हॉस्पिटलने ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले, की गेल्यावर्षी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला आणि यावर्षी दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही गंभीर स्वरूपाची आहे. या दुसऱ्या लाटेत जलद गतीने संक्रमण होताना आढळले; किंबहुना तरूणांमध्ये याचे संक्रमण अधिक आढळून आले. त्यातही या लाटेत सुरवातीच्या काळात रूग्णात फारशी लक्षणे दिसून येत नसल्याने, अनेकांनी गंभीर स्थिती झाल्यावरच दवाखान्यात दाखल होण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो. कृष्णा हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या लाटेत आजअखेर सुमारे १५०० कोरोनाग्रस्त रूग्ण दाखल झाले. त्यापैकी ११०० कोरोनामुक्त रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला असून, उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी कृष्णेची टीम तयार

दरम्यान, यावर्षी म्युकरमायकोसिस या नव्या आजारानेही डोके वर काढले असून, या आजाराचा प्रादुर्भाव झालेले ५ रूग्ण कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचाराचा दाखल झाले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली असून, दाखल रूग्णांपैकी ३ बरे झाले असून एकावर उपचार सुरू आहेत. मात्र या आजारावरील औषधांचा तुटवडा सध्या जाणवतोय. गेल्या काही दिवसांत दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असून, ही सकारात्मक बाब आहे.