फक्त साडे ३ रुपयांच्या कर्जफेडीसाठी बँकेने शेतकऱ्याला चालायला लावले १५ किमी अंतर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कर्नाटक । हजारो कोटींची कर्ज काढून देशातून फरार झालेल्या कर्जबुडव्याकडून बँका कर्जवसुली करण्यास सुस्ती दाखवत असताना बँकांच्या दुजाभावाची एक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील शिमोगा तालुक्यातील एका गरीब शेतकऱ्याला केवळ ३ रुपये ४६ पैशांचे कर्ज फेडण्यासाठी १५ किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये असणाऱ्या बारूऐ गावातील अमाडे लक्ष्मीनारायण असं या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याला एवघ्या साडे ३ रुपयांची कर्जाची रक्कम भरण्यासाठी नित्तूर या लहानश्या शहरातील कॅनरा बँकेतील शाखेत जावं लागल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

कॅनरा बँकेच्या शाखेमधून तातडीने कर्जाची रक्कम भरण्यासंदर्भात फोन आल्याने लक्ष्मीनारायण यांनी बँकेत धाव घेतल्याचे सांगण्यात येते. फोनवरुन केवळ कर्जाची रक्कम त्वरीत भरा एवढचं सांगण्यात आल्याचं लक्ष्मीनारायण म्हणतात. बँकेमधून फोन आल्याने लक्ष्मीनारायण चालतच नित्तूरकडे निघाले. लॉकडाउनमुळे बस आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने आणि स्वत:चे वाहन नसल्याने चालत जाण्याशिवाय लक्ष्मीनारायण यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. १५ किलोमीटरची पायपीट करत लक्ष्मीनारायण बँकेत पोहचल्यानंतर बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांना ३ रुपये ४६ पैशांची रक्कम भरण्याचे आदेश दिले. एवढ्याच्या रक्कमेसाठी तातडीचा फोन आल्याचे समजल्यानंतर लक्ष्मीनारायण यांना धक्काच बसला. त्यांनी तिथल्या तिथे बँकेचे उर्वरित पैसे भरले आणि कर्ज फेडलं.

लक्ष्मीनारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतीच्या कामासाठी त्यांनी बँकेकडून ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतलं होतं. त्यापैकी सरकारी योजनांअंतर्गत ३२ हजार रुपये कर्जमुक्ती देण्यात आली. उर्वरित तीन हजार रुपये त्यांनी काही महिन्यांपूर्वी बँकेत जमा केले. “बँकेतून मला फोन आला आणि तातडीने शाखेत येण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मला धक्का बसला. लॉकडाउनमुळे बस बंद आहेत. माझ्याकडे कोणतेही वाहन नाही साधी सायकलही नाही. त्यामुळेच मी चालतच बँकेत आलो तेव्हा माझ्या कर्जाच्या रक्कमेपैकी तीन रुपये ४६ पैसे शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आलं. बँकेच्या या अमानवीय वागणुकीमुळे मला दु:ख झालं आहे,” असं लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं.

कॅनरा बँकेच्या या शाखेचे व्यवस्थापक एल पिंगवा यांना यासंदर्भात विचारण्यात आले असता त्यांनी बँकेच्या ऑडिटचं कारण दिलं. त्यांना नव्याने कर्ज घेण्यासाठी आधीच्या कर्जाची पूर्ण रक्कम देणे आवश्यक असल्याने ३ रुपये ४६ पैशांसाठी लक्ष्मीनारायण यांना बोलवण्यात आल्याचं व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं. तसेच कर्ज खाते बंद करण्यासाठी लक्ष्मीनारायण यांची स्वाक्षरी आवश्यक होती असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भातील वृत्त व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी बँकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ साडे ३ रुपयांसाठी एखाद्या शेतकऱ्याला १५ किलोमीटरचे अंतर चालायला लावणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment