हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Karnataka Hoysala Temple) भारतातील अनेक मंदिरे त्यांच्या वैभवशाली इतिहासासह, अध्यात्मिक वारसा आणि विशिष्ट शिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. यांमध्ये कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिराचा समावेश आहे. दक्षिण भारतातील ही मंदिरे एकूण ९०५ वर्ष जुनी असून स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. अशा या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महत्वपूर्ण स्थान मिळाले आहे. होय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ २०२३ च्या यादीत कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे.
नेमकं कुठं आहे? (Karnataka Hoysala Temple)
माहितीनुसार, कर्नाटकातील हसन या जिल्ह्यात होयसाळेश्वर मंदिर आहे. हे मंदिर उंच चबुतऱ्यावर बांधलेले असून या चबुतऱ्यावर एकूण १२ कोरीव थर आहेत. होयसाळ मंदिर हे स्थापत्य कलेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. विशेष शिल्पकला, कोरीव काम आणि लक्षवेधी वास्तुकला या मंदिराकडे लक्ष वेधून घेते. (Karnataka Hoysala Temple) हे मंदिर ज्या १२ कोरीव थरांवर उभारलेले आहे त्यांना जोडण्यासाठी चुना, सिमेंट किंवा इतर कोणतीही सामग्री वापरलेली नाही ही आणखी एक खासियत. येथील कोरीव काम अगदी थक्क करणारे आहे. एखाद्या मशीनच्या मदतीने देखील होणार नाही इतके सुरेख कोरीवकाम या मंदिरात केलेले आहे. त्यामुळे पाहताना अगदी हरवून जावेसे वाटते.
होयसाळ मंदिराचा इतिहास
दक्षिण भारतात इसवी सन १० ते १४ च्या शतकादरम्यान होयसळ साम्राज्य अस्तित्वात होते. या साम्राज्याने सध्याच्या कर्नाटक राज्याचा बहुतांश भाग आणि गोवा राज्याचा काही भाग काबीज केला होता. त्यामुळे या भागांवर त्यांचे राज्य होते. दरम्यान, होयसाळ राजांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे १५०० मंदिरे बांधली होती. या समूहातील ही मंदिरे कर्नाटक राज्यातील बेलूर, हळेबिडू आणि सोमनाथपुरा प्रदेशात विखुरलेली आहेत. (Karnataka Hoysala Temple) कर्नाटक राज्यातील होयसळ समूहातील ही मंदिरे राजा विष्णुवर्धनाच्या कारकिर्दीत बांधण्यात आल्याचे काही पुरावे इतिहास तज्ञांना सापडले आहेत. शिवाय काही अवशेषांनुसार आणि पुराव्यानुसार कर्नाटकातील होयसाळ मंदिराची निर्मिती ११२१ मध्ये करण्यात आल्याचे समजते.
कसे जाल?
म्हैसूर विमानतळापासून होयसाळ मंदिर सुमारे १५० किमी अंतरावर आहे. तर हसन रेल्वे जंक्शन हे कर्नाटकशी जोडलेले एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. हसन जंक्शन होयसाळेश्वर मंदिरापासून फक्त ३० किमी अंतरावर आहे. (Karnataka Hoysala Temple) त्यामुळे रेल्वे किंवा हवाई मार्गांपैकी एकाची निवड करून तुम्ही येथे जाऊ शकता.