सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरज तालुक्यातील बेडग येथे कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात पार पडला. बेडगेत फार वर्षां पूर्वीपासून जेष्ठ महिन्यात जेष्ठ नक्षत्राच्या मुहूर्तावर बेंदूर करण्याची प्रथा आहे सकाळ पासून बैल व इतर जनावरांना सजवण्यासाठी साहित्यांच्या खरेदीसाठी ग्रामस्थांनी राजवाडा चौकात गर्दी केली होती तसेच घरगुती बैल पुजन्यासाठी मातीच्या बैलांचे स्टाँल लावण्यात आले होते.
बेडगेत मानाचा बैल परंपरेने अमरसिंह पाटील यांच्याकडे असून या बैलाला सजवून पाटील यांच्या वाड्यातून वाजत गाजत ग्रामपंचायतीसमोर नेले. येथे सरपंच सौ.रुपाली दिनेश शिंदे व सर्व सदस्यांच्या हस्ते बैलाचे पूजन केले. तसेच चावडी पासून अमरसिंह पाटील यांच्या वाड्यापर्यंत मानाचा बैल पळवण्यात आला. बेडगेत सुमारे २५० वर्षापासून बेंदराला बैल पळवण्याची प्रथा आहे. बैलाच्या दोरीचे मान शेगणे, बिंदगे ,लिबींकाई या परिवाराकडे आहे इतर सर्व बारा बलुते दारांच्याकडे असेच वेगवगळे मान आहेत.
सर्व जाती धर्माचे लोक या मानाच्या बैलाचा सोहळा पाहण्यासाठी हजारोच्या संखेने उपस्थित असतात. अमरसिंह पाटील हे या मानाच्या बैलाचा परंपरेने सांभाळ करतात. बेंदरा दिवशी मानाच्या बैलाला रंगरगोटी करुन सजवून सायंकाळी हजारोच्या संखेने वाजत गाजत चावडी पासून पाटील यांच्या वाड्यापर्यंत पळत जाऊन बैल वाड्यात उडी मारून जातो. उडी मारल्यानंतर सर्व ग्रामस्थ बैलाने कर तोडली म्हणत उत्साहात सण साजरा करतात. हा अनोखा बेंदूर सण पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.