सोलापूर प्रतिनिधी । कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत हे करणार असून, त्यांच्या पूजेला शिवसेनेचा कसलाही विरोध नाही आहे, असा निर्वाळा सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी गुरुवारी दिला.
मागील १४ दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. अशातच काल पंढरपुरात एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने चंद्रकांत पाटलांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला विरोध केला होता. या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
परंतु त्यानंतर आज खुद्द विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना कोणताही विरोध नसून आम्ही त्यांचे स्वागत करणार असल्याचे स्पष्ट करत महापूजे संदर्भातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.