काश्मीर ते कन्याकुमारी : वय अवघे दहा वर्षे अन् प्रवास 4 हजार किलोमीटर प्रवास

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वय अवघे 10 वर्षे अन् 4 हजार किलोमीटर प्रवास तोही सायकलवरून एका चिमुकलीने सुरू केला आहे. ठाणे येथील या चिमुकलीचे नाव सायली पाटील असे आहे. आज सातारा येथे सायली पाटील हिचे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले. तसेच यावेळी सायलीचे अभिनंदन करत फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.

सायली पाटील हिने काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. “बेटी बचाव बेटी पढाव” हा संदेश घेऊन ती साताऱ्यात आली. यावेळी जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजेंनी तिचे स्वागत करून तिला वाट्टेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिने आतापर्यंत 2200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला असून अजून 1800 प्रवास शिल्लक आहे. राहिलेला प्रवास 18 दिवस पूर्ण करण्याचा सायलीचा मानस आहे.

आज 23 व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले. सायकल पट्टू सायलीला खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या असून फ्रान्स येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. केवळ अवघे 10 वय असलेल्या सायलीच्या या जिद्दीचे सध्या काैतुक होत आहे.