सातारा प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश पातळीवरच्या नियुक्त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी नुकत्याच जाहीर केल्या. यावेळी करण्यात आलेल्या निवडीत पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षपदी प्रा. कविता म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा. कविता म्हेत्रे यांनी म्हसवड नगरपालिकेच्या नगरसेविका, विरोधी पक्ष नेत्या म्हणून काम केले आहे. पक्ष संघटनेत तालुका, जिल्हा, प्रदेश पातळीवरील जबाबदारी संभाळली आहे. प्रसिध्द वक्त्या, लेखिका, कवयित्री, राजकीय अभ्यासक व विश्लेषक तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या चळवळीतील कार्यकर्त्या आहेत.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रा. म्हेत्रे यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी त्या म्हणाल्या की, महिला सबलीकरणासाठी स्वातंत्र्योत्तर काळात शरद पवारांएवढे कोणत्याच राजकीय नेत्याचे योगदान नाही. शरद पवार यांचे हे कार्य विभागातील प्रत्येक महिलेपर्यंत घेऊन जाणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य महिला ही पक्षाची मतदार व मतदार महिला पक्षाची कार्यकर्ता बनविण्यावर विशेष भर देऊन महिला संघटना वाढविणार आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, आरोग्य व राजकीय सबलीकरणासाठी काम करणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.
निवडीबद्दल प्रा. कविता म्हेत्रे यांचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अभिनंदन केले.