केदार जाधव राजकारणात उतरणार; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचा खेळाडू आणि आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळलेला केदार जाधव (Kedar Jadhav) आता राजकारणाच्या मैदानात पॅड बांधून उतरणार आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी राजकारणात उतरायला सुद्धा आपण तयार आहे असं केदार जाधव याने सांगितलं. तो एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. परंतु आपण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत मात्र केदार जाधवने कोणतीही माहिती दिली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केदार जाधवने भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हापासून तो भाजपमध्ये प्रवेश करणार किंवा राजकारणात तरी उतरणार अशा चर्चा सुरु होत्या. त्याच पार्श्वभूमीवर त्याला भाजप प्रवेशाबद्दल विचारलं असता मी कुठल्या पक्षात जाणार हे सांगणे खूप लवकर होईल. परंतु नक्कीच मला राजकारणात काम करायला आवडेल. हे काम महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी असेल. माझा वेळ त्यासाठी द्यायलाही मी तयार आहे असं केदार जाधवने म्हंटल.

केदार जाधव पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा सर्व पक्षातील नेते तुम्हाला ओळखतात. सगळ्यांनी तुम्हाला आपुलकीने वागवलेले असते. मी सोलापूरच्या माढा तालुक्यातील जाधववाडी गावासारख्या ग्रामीण भागातून आलो. आधी महाराष्ट्र आणि नंतर भारतासाठी मी खेळलो असल्याने राजकीय पक्षांना माझ्याबद्दल आदर आहेच. त्यामुळे जर राजकारणात संधी आली तर मी तयार आहेच असं म्हणत केदार जाधवने राजकारणातील आपल्या प्रवेशाबद्दल सूचक विधान केलं आहे. आता तो कोणत्या पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतो ते पाहायला लागेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत केदार उतरतो का याकडे सुद्धा त्याच्या चाहत्यांचे लक्ष्य असेल.