रस्त्यावर कचरा केल्यास ऑन द स्पॉट दंड! सातारा नगरपालिकेची धडक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांर्तगत राज्यातील सर्व नगरपालिकांकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचऱ्यांची ओला आणि सुका अशी वर्गवारी न करता तो तसाच घंटागाडीत टाकणे,  रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे अथवा शौच करणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका देखील कामाला लागली आहे. घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य खराब करणाऱ्या नागरिकांवर आता ‘ऑन दि स्पॉट’ कारवाई सुरू करण्यात आली आहे.

याची अंमलबजावणी सातारा पालिकेकडून सुरु झाली असून दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. सध्या या कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली असून, कारवाई आणखीन तीव्र केली जाणार असल्याची देखील माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच या संबंधीचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना देखील देण्यात आले आहे. दरम्यान सातारा पालिकेने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी पालिकेने काही पथकांची निर्मिती केली आहे.

Leave a Comment