हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या आवाजावर माणदेशकरांना रेडिओकडे खेचून आणणाऱ्या आणि हम भी किसी से कम नहीं, असे प्रत्येकाला सांगण्याचे काम मानदेशचा आवाज असलेल्या आरजे केराबाई खांडेकर यांनी केले. माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून देशात व विदेशात अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील केराबाई दादा खांडेकर यांचे शनिवार, दि. 21 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने माणदेशाचा आवाज हरपला आहे.
सातारा जिल्ह्यातील 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. त्यांनी माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर लोकगीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. लहानपणापासून आई आणि आजीची जात्यावरची गाणी ऐकल्याने त्यांनी पुढे त्याच गाण्यांचे सादरीकरण रेडिओ शोच्या माध्यमातून सर्वांनपुढे केले.
वास्तविक पाहता प्रत्येकाला रेडिओ जॉकीच्या खुर्चीत दिमाखात बसावे आणि बेभानपणे मनमोकळे बोलावे असे वाटते. मात्र, प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशात एका छोट्याशा गावात राहणारी एक बाई तिचे हे स्वप्न फक्त पूर्ण तर करतेच, शिवाय तब्बल 15 वर्षं ते जगते. लिहिता वाचता येत नसतानाही फक्त आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर केराबाई यांनी हजारोंशी संवाद साधून त्यांच्या मनात घर केले होते. त्या केराबाई खांडेकर याचे शनिवारी दुःखद निधन झाले.
असा होता केराबाईंचा रुबाब
म्हसवड येथील चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फौंडेशन व महिला बँकेच्या मार्फत सातारा, मुंबई व पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये दरवर्षी माणदेशी महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवाच्या प्रवेशद्वारावरच माणदेशातील ग्रामीण भागातील महिलांची अस्सल ओळख सांगणारी, नऊवारी काठापदराची साडी, नाकात मासोळी मोत्याची नथ, कानात बुगडी, कपाळावर ठसठशीत उठून दिसणारा कुंकूवाचा टिळा, गळ्यात डोर्ल, सोन्याची बोरमाळ, कंबरेला चांदीचा घुंगरपट्टा व दोन्ही हात भरुन असलेला चुडा व कानावर धरलेला मोबाईल या अस्सल माणदेशी व आधुनिकतेकडे झुकणार्या केराबाईंचे बॅनर क्षणार्धात अनेकांचे लक्ष वेधून घेत.