हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Khadki Metro Station । पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आजपासून खडकी मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी सुरू झालं आहे. हे स्थानक पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वाच्या मार्गावर आहे. हे स्थानक पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील सर्वाधिक महत्त्वाचे स्थानक मानले जात आहे . हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाजवळ असून यामुळे मेट्रो आणि रेल्वे वाहतूक सेवांचे एकत्रीकरण सुलभतेने शक्य झाले आहे. तसेच या मेट्रो स्थानकातून प्रवाश्याना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोप्प होईल – Khadki Metro Station
खडकी येथील या नव्या मेट्रो स्थानकामुळे (Khadki Metro Station) ऑफिसला जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे मेट्रो स्टेशन सुरू होण्यापूर्वी, या कॉरिडॉरवरील गाड्या खडकी आणि रेंज हिल दोन्ही स्थानकांना बायपास करत होत्या, ज्यामुळे प्रवाशांना थेट शिवाजीनगरहून बोपोडीला प्रवास करावा लागत होता. आता मात्र खडकी मेट्रो स्थानकामुळे प्रवाशांना थेट खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे अतिशय सोप्प होईल. तसेच पुण्यातील पीएमपीएमएल वर असलेला ताणही या मेट्रो स्थानकामुळे कमी होईल. परिणामी वाहतूक कोंडीवर मात होण्यास मदत होईल.
याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटल की, खडकी स्थानकाच्या (Khadki Metro Station) विस्तारामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट झाली आहे. खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल आणि मुळा रस्ता या ठिकाणी राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या नागरिकांना या स्थानकाचा मोठा फायदा होईल. या विस्तारामुळे पुणे मेट्रोचे नेटवर्कआणखी मजबूत होईल.
दरम्यान, पुणे मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल एकाच दिवशी तब्बल ३.१९ लाख पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी आणि आकुर्डी येथून शहरात पोहोचण्यासाठी अनेक रस्ते बंद असल्याने पुणेकरांनी मेट्रोचा पर्याय निवडला. प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मेट्रोने धन्यवाद दिले.