खंडाळा नगरपंचायत : नगराध्यक्षपदी नंदा गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी सुधीर सोनावणे बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या खंडाळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नंदा तात्याबा गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी सुधीर चंद्रकांत सोनावणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी तथा प्रांतधिकारी राजेंद्र जाधव व मुख्यधिकारी चेतन कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खंडाळा नगरपंचायतीची गुरुवारी विशेष सभा पार पडली. या सभेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी बहुमत असलेल्या राष्ट्रवादीकडुन नंदा तात्याबा गायकवाड यांनि अर्ज दाखल केला. त्यामुळे त्याची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी चार फेब्रुवारीला एकच अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष निवड ही आज केवळ औपचारिकता होती.

यावेळी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मात्र, राष्ट्रवादीकडून सुधीर चंद्रकांत सोनावणे तर विरोधी भाजपा कडुन संदीप प्रकाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीत भाजपाने उमेदवारी अर्ज माघार घेतला. यामुळे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सुधीर सोनावणे हे बिनविरोध म्हणून निवडुन आले.

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर गुलालाची उधळण करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे बुधवारी संध्याकाळी पक्षाकडुन निवडून आलेल्या नगरसेवकांशी चर्चा केली होती. दरम्यान आज सकाळी आमदार मकरंद पाटील यांनी याबाबतचा निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादी कडुन उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

Leave a Comment