राज्य सरकारचा मोठा निर्णय; जेजुरीतील ‘या’ गडाला संरक्षित स्मारकाचा दर्जा

Khandoba Fort
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या कुलदैवताचे स्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिर आणि गडकोटाला राज्य सरकारने राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने यांनी याबाबतचे अधिकृत पत्र श्री मार्तंड देवस्थानाला पाठवले आहे. प्राचीन वारसा लाभलेला खंडोबा गड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, वर्षभरात 7 ते 8 मोठ्या यात्रा येथे भरतात. याशिवाय, रोज हजारो भाविक कुलधर्म आणि कुलाचार करण्यासाठी येथे येतात. दरवर्षी सुमारे 50 लाखांहून अधिक भाविक जेजुरीला भेट देतात.

संरक्षित स्मारकाचा दर्जा –

राज्य सरकारने याठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला असून, एकूण 349 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 109 कोटी रुपयांची कामे पहिल्या टप्प्यात सुरू असून, संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यामुळे आता विकासकामांना अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.

संवर्धन आणि विकासाची दिशा –

या निर्णयाची माहिती देवस्थान विश्वस्त मंडळाने पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, नित्य सेवेकरी, पुजारी, सेवेकरी आणि ग्रामस्थांना दिली आहे . यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, तसेच ऍड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, अनिल सोंडदे, ऍड. विश्वास पानसे, माजी विश्वस्त नितीन राऊत, संदीप जगताप, व्यवस्थापक आशिष बाठे आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यामुळे जेजुरीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक संवर्धन आणि विकासाची दिशा लाभणार आहे.