औरंगाबाद : एमएसआरडीसीकडून आता ऐतिहासिक सातारा येथील खंडोबा मंदिराचे नूतनकरण करण्यात येणार आहे. राज्यात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचे काम करणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळं (एमएसआरडीसी) आता पुरातन वास्तुंना पुनर्वैभव देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. महामंडळाने पहिल्या टप्प्यात 101 कोटी रुपये खर्चून 8 मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याकरिता निविदा मागवण्यात आल्या आहेत. मंदिरासह परिसर विकास करून सुविधा निर्माण केल्या जातील. सातारा येथील खंडोबा मंदिराचा यात समावेश आहे.
एमएसआरडिसिने प्राचीन मंदिरे, लेणी आणि शिल्पांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रस्तवाला राज्य मंत्रीमंडळाच्या 23 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या रोजी महामंडळाने मंदिराचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी डीपीआर तयार करण्याकरिता निविदा काढली. 26 जून रोजी निविदा उघडल्या जातील. निवड झालेल्या संस्थेला 3 महिन्यात डीपीआर तयार करावा लागेल.
पहिल्या टप्प्यात साताऱ्याचे खंडोबा मंदिर, माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीचे भगवान पुरुषोत्तम मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. मंदिराचे संवर्धन आणि संरक्षण करताना परिसराचा विकास, प्रवेश मार्गमध्ये सुधार आणि अन्य सुविधा निर्माण केल्या जातील. यातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. यामुळे भाविक आणि पर्यटक अधिक आकर्षित होतील.