हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Khuldabad Name Change । औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केल्यानंतर मराठवाड्यातील आणखी एका शहराचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. हे शहर दुसरं तिसरं कोणतेही नसून औरंगजेबाची कंबर असलेलं खुलताबाद (Khuldabad) आहे. या खुलताबाद शहराचे नामांतर रत्नापूर करण्यात यावं अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर (Sanjay kenekar) यांनी केली आहे. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना पत्र पाठवणार असल्याची माहितीही संजय केणेकर यांनी दिली.
औरंगजेबाचे नाव पाहतो तेव्हा रक्त खवळते Khuldabad Name Change-
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय केणेकर म्हणाले, आपल्या भारतावर ज्या ज्या आक्रमकांनी राज्य केलं आहे, मग तो आदिलशाह असो, निजामशाह असो वा इतर मुघल किंवा इंग्रज असो, या सर्वांचा इतिहास जागविण्याचे काम काँग्रेसने केलं आहे. परंतु हा इतिहास मिटविण्याचे काम आम्ही करू. वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे आहे, मात्र याठिकाणी शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लपवण्यात आला आहे. आणि आक्रमण ज्यांनी केलं त्यांचा इतिहास जागवण्यात आलं आहे. जेव्हा मी खुलताबादला जातो आणि तिथे औरंगजेबाचे नाव पाहतो, तेव्हा माझे रक्त खवळते. त्यामुळेच खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर असे करण्याची मागणी (Khuldabad Name Change) मी करणार आहे.
ते पुढे म्हणाले, एवढच नव्हे तर संभाजी महाराज आणि त्यांचे साथीदार संताजी घोरपडे, दादाजी जाधव आणि ताराबाई राणी यांसारख्या वीरांनी औरंगजेबाविरुद्ध हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला, औरंगजेबाला गाडण्याचे काम केलं, त्याच्या विचारांना गाडण्याचे काम केलं . त्यामुळे या वीरांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी, त्यांच्या शौर्याचे जतन करण्यासाठी रत्नपूर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिव्य आणि विशाल पुतळा उभारण्यात यावा अशा मागणीचे पत्र आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठवणार असल्याची माहिती संजय केणेकर यांनी दिली आहे.




