इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी; किरण मानेंचा उदयनराजेंना सवाल, आपल्या आईबापांचे वाभाडे…

0
2
Kiran Mane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajeet Sawant) यांना नागपूर येथील प्रशांत कोरटकर या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. महत्वाचे म्हणजे, आता सावंत यांनी सोशल मीडियावर संबंधित व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये झालेले कॉल रेकॉर्डिंग शेअर केले आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व प्रकारानंतर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी खासदार उदनयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना सवाल विचारला आहे.

आपल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी म्हटले आहे की, छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे… एक सातारकर तुम्हाला हक्कानं विचारतो आहे. इंद्रजीत सावंतांना आलेल्या धमकीच्या फोनमध्ये छ. शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का? की आपल्या आईबापांचे वाभाडे निघूनही आम्ही लाचारच राहू? तुम्ही म्हणाल तसं!

“धमक्यांना मी भीक घालत नाही”

त्याचबरोबर, इंद्रजीत सावंत यांनी या धमकीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्याची पूर्ण क्षमता माझ्यात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून असा समाजविघातक प्रकार पुन्हा घडणार नाही.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “कोरटकरने मध्यरात्री फोन करून जातीवाचक भाषेत बोलत मला धमकावले. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. तसेच, ‘हा महाराष्ट्र पेशव्यांचा आहे का?’ असा अवमानकारक प्रश्न विचारला.”

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणले की, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा अपमानास्पद विधानं करणाऱ्या व्यक्तींना वेळीच रोखलं पाहिजे. अशा विषारी विचारसरणीला कोणीही पाठिंबा देऊ नये. समाजात फूट पाडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”