हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Death Case) हिच्या मृत्यू प्रकरणांमध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा याच प्रकरणासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
किशोर तिवारी यांनी म्हणले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जेव्हा इच्छा होईल, तेव्हा कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात अटक होऊ शकते. त्यांनी केलेल्या याचं वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात चर्चा रंगल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत अनेक संशय व्यक्त करण्यात आले आहेत. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनचा मृतदेह तिच्याच इमारतीच्या खाली आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी आत्महत्या असल्याचे सांगितले, मात्र या प्रकरणात मोठ्या राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, आता किशोर तिवारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचे भाग बनले आहे. महत्वाचे म्हणजे, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर किशोर तिवारी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर मातोश्री आणि शिवसेना भवनावर कब्जा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले होते.