विचार तर कराल | दीपक चटप, विक्रांत खरे
भारतात पतंग उडविणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. धारदार मांजाचा वापर करून इतरांची पतंग कापणे अशी चुकीची पद्धत या संस्कृतीत रूढ होणे हे दुर्दैवीच. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन किंवा कोणत्याही बिगर-बायोडिग्रेडेबल सिंथेटिक सामग्रीच्या स्वरूपातील मांजाने जीव जाण्याचे प्रकरण वाढू लागले आहेत. नुकतेच डॉ. कृपाली जाधव ह्या पुण्यावरून भोसरीकडे जात असताना नाशिक फाट्यावरील दुमजली उड्डाणपुलावर मांजाने गळा चिरल्याने त्यांचा प्रचंड रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. याआधी पत्रकार सुवर्णा मुजुमदार यांचा देखील मांजाने मृत्यू झाला होता. यासारख्या असंख्य घटना याआधी देखील घडल्या आहेत.
मकरसंक्रांतीच्या सणाला ठिकठिकाणी पंतग उडवून हा सण आनंदाने साजरा केला जातो. याकालावधीत अश्याप्रकारे मांजामुळे बऱ्याच ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आपण पाहतो. त्याचबरोबर मानवी जिवाच्या हानीसोबत प्राणी पक्षांचे देखील जीव जात असतात. आपल्या कुठल्याही उत्सवामुळे अथवा कृतीमळे जर एखाद्याचा जीव जाऊन त्या कुटुंबात दु:ख निर्माण होत असेल तर हि बाब अत्यंत गांभीर्याने हाताळली पाहिजे. आज शहरी भागात ‘पतंग उत्सव’ आयोजित केला जातो. अशाप्रकारचे उत्सव आयोजित करण्याला अथवा पतंग उडविण्याला कुणाचाही विरोध नाही. परंतु, पतंग उडवीत असताना जो जीवघेणा मांजा वापरला जातो त्याचा विरोध समाजातील सजग नागरिकांनी केला पाहिजे. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व राज्य सरकारांनी अशा जीवघेण्या मांजावर प्रतिबंध घातला पाहिजे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ११ जुलै २०१७ रोजी ‘पेटा’ (PETA) या प्राण्यांच्या हक्क व संवर्धनाबाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने मांजा बंदी संदर्भात केलेल्या याचिकेवर निर्णय देताना “चायनीज व साधा (काच लावलेला) मांजा , नॉयलॉन किंवा सिंथेटिक मटेरियलने तयार झालेला मांजा त्याचप्रमाणे अविघटनशील(नॉन-बायोडिग्रीडेबल) याप्रकारचा मांजा वापरण्यास, तयार करण्यास, साठवण्यास, विकण्यास व विकत घेण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते.” राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाने राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सर्व मुख्य सचिवांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देखील दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली मुख्य सचिवांनी दाखविल्याने न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर देखील आज बंदी घातलेला मांजा सर्रास बाजारात दिसून येतो आणि त्याचा वापरावर कुठेलेही निर्बंध आलेले दिसत नाहीत. परंतु, नागरिक म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे ही सर्वस्वी आपली जबाबदारी असून असे आदेश न पाळणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबादारी आहे.
संस्कृती जोपासणे, उत्सव साजरा करणे अथवा सण साजरा करणे हा आपला हक्क आहेच. परंतु, त्याचबरोबर भारतीय संविधानातील कलम ५१ अ (ग) नुसार पर्यावरणाचे संवर्धन करणे हे संवैधानिक कर्तव्य आहे हे देखील विसरता काम नये. त्याचप्रमाणे प्राण्यांची व मानवी जीविताची हानी होणार नाही हे देखील बघितले पाहिजे. शाळेत असताना मराठी बालभारती पुस्तकात अ. ज्ञा. पुराणिक यांची ‘पतंग उडवू चला’ ही कविता आनंदाने म्हणायचो. पतंग उडविण्याच्या या आनंदामुळे कुठलेही विघ्न येता कामा नये. त्यासाठी पर्यावरणपूरक मांजा वापरूनच पतंग उडविण्याचा आनंद साजरा केला पाहिजे. सरतेशेवटी, प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे. झालेल्या दुर्घटनांमधून सकारात्मक बदल समाजात निर्माण होणार नसेल तर असा समाज कधीच प्रगतीकडे वाटचाल करू शकणार नाही. तेव्हा, या बदलाची सुरवात स्वतःपासून करून यापुढे बंदी घातलेला मांजा वापरायचा नाहीच पण त्याचबरोबर अशा प्रकारचा मांजा कुठेही आढळून आल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. आपल्या या कृतीतून अनेक जीव वाचू शकतात.