के एल राहुल RCB च्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता; लखनौला धक्का बसणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL २०२५ पूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. लखनऊ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुल (K L Rahul) संघाची साथ सोडून रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये सामील होऊ शकतो. दैनिक जागरणच्या अहवालानुसार राहुल आणि लखनौ फ्रँचायझी यांच्यातील संबंध आणखी बिघडले आहेत. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यामुळेच आता के एल राहुल लखनौच्या संघाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी अनेक मोठे बदल आणि घडामोडी पाहायला मिळू शकतात. बीसीसीआय आणि फ्रँचायझी मालकांमध्ये लवकरच एक बैठक होणार असून किती खेळाडूंना रिटेन करता येईल? यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मोठा लिलाव असल्याने अनेक बडे खेळाडू त्यामध्ये पाहायला मिळू शकतील. त्यामध्ये के एल राहुल सुद्धा असू शकतो. राहुल २०२२ पासून लखनौच्या संघाचे नेतृत्व करत आहे मात्र दमदार खेळाडू असूनही संघाला अपेक्षित यश त्याच्या नेतृत्वाखाली मिळालं नाही. मागच्या हंगामात सुद्धा लखनौचा संघ ७ व्या क्रमांकावर होता. त्यामुळे राहुल आणि लखनौचे संबंध बिघडल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे रॉयल चॅलेंजर बंगळुरूला सुद्धा भविष्याच्या दृष्टीने भारतीय कर्णधाराची गरज आहे. २०२२ मध्ये विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डू प्लेसिस संघाचा नवा कर्णधार बनला, पण आता ४० वर्षीय फॅफ फ्रँचायझीला फार काळ साथ देऊ शकेल असं वाटत नाही. के एल राहुल हा मूळचा कर्नाटकचाच आहे. राहुलने 2013 मध्ये RCB सोबत आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर हैदराबादच्या संघात तो सामील झाला 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या RCB संघाचा एक भाग होता. नंतर तो लखनऊ सुपर जायंटचा कर्णधार झाला. आता पुन्हा एकदा तो आरसीबीच्या ताफ्यात आपल्याला दिसू शकतो.