जमिन वाटणीच्या वादातून दोन मावशीवर चाकू हल्ला

कराड | सैदापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत जागेच्या वाटणीवरून एकाने दोन्ही मावशीवर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यबााबतची फिर्याद शालन वसंत कांबळे (वय 55, रा. बेघर वस्ती, सैदापूर ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शालन वसंत कांबळे, नंदा लक्ष्मण माने (रा. विहापूर, ता. कडेगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर सुनिल प्रकाश बनसोडे असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर येथे कुंदा प्रकाश बनसोडे हिने जागेच्या वाटणी संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन बहिणींना बोलविले होते. त्यावेळी फिर्यादी शालन वसंत कांबळे व नंदा लक्ष्मण माने (रा. विहापूर, ता. कडेगाव) हि पण तेथे आली होती. वाटणी संदर्भात चर्चा चालू असताना दुपारी 1.30 वाजणेच्या सुमारास फिर्यादी शालन ह्या सुनिल यास तुझ्या हिस्स्यातील जागा तू विक आमच्या हिश्यातील जागेत लक्ष घालू नको असे सांगितले.

यावेळी सुनिल याने चिडून जाऊन घरात असलेला चाकू घेऊन नंदा हिचे अंगावर धावून जावून शिवीगाळ करून हातातील चाकूने नंदा हिच्या मानेजवळ पाठीमागे चाकूने वार केला. त्यावेळी शालन ह्या सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही सुनिलने शिवीगाळ करून हातातील चाकूने कानावर वार करून जखमी केले. याबाबत शालन कांबळे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.