खंडपीठात आजपासून ऑनलाइन कामकाज

औरंगाबाद – कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कोरोनाने धडाधड खाते उघडल्याने शेवटी आजपासून औरंगाबाद खंडपीठात ऑनलाइन सुनावणीस प्रारंभ होणार आहे.

गेल्या 15 दिवसांपासून अधिक काळापासून प्रत्यक्ष सुनावणीसाठी वकिलांसह न्यायमूर्ती आग्रही होते. मात्र, खंडपीठातील काही न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील काही न्यायमूर्ती बरे होऊन त्यांनी पुन्हा कामकाजाची धुराही सांभाळली. पण अधिक धोका नको आणि कामकाजही प्रभावित व्हायला नको, यामुळे खंडपीठात आज पासून ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठात प्रकरणाच्या सुनावणीचे कामकाज मंगळवार पासून पुढील दोन आठवडे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी आणि सचिव ॲड. सुहास उरगुंडे यांनी दिली. खंडपीठातील काही न्यायाधिश, वकिलांना कोरोनाची लक्षणे दिसून आली असून, न्यायालयातील गर्दी पाहता ऑनलाइन कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातूनच काम करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.