हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देऊन, भारताला आधुनिक जगाची कवाडं उघडून देणाऱ्या माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची मानवी बॉम्बच्या साहाय्याने हत्या करण्यात आली. सुरुवातीला राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिलेले राजीव गांधी, पुढे संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर राजकारणात प्रवेश केला, पुढे ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधानही झाले. भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा हा तरुण नेता भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन गेला…
राजीव गांधी यांचा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. राजीव गांधी यांचं नाव त्यांचे आजोब म्हणजे पंडीत जवारहलाल नेहरु यांच्या पत्नीच्या नावावरुन ठेवण्यात आले. पंडीत नेहरुंच्या पत्नीचे नाव कमला नेहरु. कमला म्हणजे लक्ष्मी आणि ‘राजीव’ हे सुद्धा कमळाचे दुसरे नाव. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या या पहिल्या मुलाचे नाव ‘राजीव’ ठेवण्यात आले.
राजीव गांधी हे देशातील सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांनी वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली. महिन्याभराच्या मोठ्या निवडणूक प्रचार कार्यक्रमादरम्यान श्री. राजीव गांधी यांनी पृथ्वी परिघाच्या दीडपट अंतराची यात्रा करत देशातील जवळपास सर्व भागात जाऊन 250 पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि लाखो लोकांना प्रत्यक्ष भेटले.
राजीव गांधी यांना कॉम्प्युटर, गॅजेट्स यांमध्ये अधिक रस होता. पंतप्रधान म्हणूनही त्यांनी देशात तंत्रज्ञानासंबंधी विकासात पुढाकार घेतला. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला ताकदवान बनवण्याचं त्यांनी कायम स्वप्न बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णयही घेतले. भारताला संगणकयुगात आणणारा पंतप्रधान म्हणूनही त्यांची ओळख आहे.
डिजिटल क्रांतीसह राजीव गांधी यांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. 1986 साली राजीव गांधी यांनी ‘जवाहर नवोदय विद्यालय योजना’ ही महत्त्वपूर्ण योजना आणली. 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत निवासी शिक्षणाची तरतूद या योजनेत होती. या योजनेची सर्वच स्तरातून स्तुती झाली होती.
इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. “धनु” नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.