हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kokankada Reverse Waterfall) राज्यभरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. खास करून पावसाळ्यात फिरायला मजा येईल अशा ठिकाणांची काढू तेव्हढी यादी कमीच. त्यात पर्यटकांचा सर्वाधिक कल हा लहान मोठ्या धबधब्यांकडे असतो. अशाच धबधब्यांपैकी एका अद्भुत आणि नयनरम्य ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. जे उंच कड्यावरून खाली कोसळताना दिसतात. अशी दृश्य पाहून मन अगदी ओलंचिंब होऊन जात. पण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला आव्हान देईल असा आकाशाच्या दिशेने वाहणारा धबधबा पाहिलाय का? नाही? चला तर या वेगळ्या आणि आकर्षक धबधब्याविषयी जाणून घेऊया.
आश्चर्यकारक उलटा धबधबा (Kokankada Reverse Waterfall)
राज्यभरात अनेक आश्चर्यकारक धबधबे आहेत. पण डोळ्याचं पारण फेडणारा महाराष्ट्रातील रिव्हर्स धबधबा पाहण्याची मजा काही औरच आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकडा परिसरात असलेला हा धबधबा रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध आहे. पृथ्वीवरील अनेक रहस्यमयी ठिकाणांमध्ये या ठिकाणाचा देखील समावेश आहे. इथे जमिनीच्या दिशेने नव्हे तर आकाशाच्या दिशेने धबधबा वाहतो. त्यामुळे हा धबधबा पहायला अनेक पर्यटक गर्दी करताना दिसतात.
गुरुत्वाकर्षणाला देतो आव्हान
कोकणकडा नाणेघाट धबधबा परिसर हा कायम शुभ्र धुक्यात हरवलेला असतो. त्यामुळे हा परिसर कायम पर्यटकांना आकर्षित करतो. इथे वाऱ्याच्या प्रवाहाने उंचावरून पडणारे पाणी हे थेट आकाशाच्या दिशेने वरती फेकले जाते. त्यामुळे नाणेघाट धबधबा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकाच रहस्यमयी वाटतो. (Kokankada Reverse Waterfall) हवेच्या दाबामुळे हा धबधबा खरतर उलटे पाणी फेकतो. मात्र यामुळेच डोंगर कपारीवर हे दृश्य पाहताना मनाला मिळणारा आनंद फार वेगळाच असतो. या धबधब्यातील उलटे वाहणारे पाणी एकप्रकारे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला आव्हान देत आहे.
पावसाळ्यात होते पर्यटकांची गर्दी
कोकणकडा नाणेघाट धबधबा हा अत्यंत सुंदर आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. खास करून हा धबधबा पावसाळ्यात फारच मनमोहक वाटतो. त्यामुळे इतर कोणत्याही दिवसांपेक्षा जास्त पावसाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी जास्त असते. इतर कोणत्याही धबधब्यांपेक्षा वेगळा आणि निसर्गाचा चमत्कार असलेला हा धबधबा पहायला लोक लांबून येतात. (Kokankada Reverse Waterfall) तुम्हीही या पावसाळ्यात कोकणकडा नाणेघाट धबधबा पहायला जरूर जा आणि अविस्मरणीय क्षणांचा मनमुराद आनंद घ्या.