कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेलं नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळालं. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी एन पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षांने मंत्रिपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात टाकली. यामुळं पीएन समर्थक नाराज आहेत.
गेली चाळीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदार पी एन पाटील यांच्या पक्षनिष्ठेच हेच फळ का? असा सवाल करत पक्षनिष्ठेची नियमावली सांगा आणि त्यात आम्ही कुठे कमी पडलो हे देखील दाखवून द्या असा आक्रमक पवित्रा पी एन पाटील यांच्या समर्थकांनी घेतला आहे.
दरम्यान पीएन समर्थकांचा उद्या मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षात राहण्याबद्दल आमदार पी एन पाटील यांना फेरविचार करण्याचा आग्रह कार्यकर्त्याकडून होऊ शकतो. असं असलं तरी पक्षावर नाराज असलेल्या पी एन पाटील यांनी सध्या तरी या सगळ्या प्रकारावर मौन बाळगलं आहे.