व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार? ‘भाजपा-सेने’साठी धोक्याची घंटा !

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वही १० जागांसाठी अत्यंत अटीतटीचे सामने आहेत. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असताना हळूहळू कल स्पष्ट होऊ लागला आहे. त्यानुसार आठ जागा लढविणारी शिवसेना जिल्ह्यात ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे तसेच दोनच जागा लढविणाऱ्या मित्रपक्ष ‘भाजपा’च्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात कोरी पाटी राहिलेल्या काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाने यावेळी खाते उघडण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावून टक्कर देण्याचे ठरवले आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांनी लक्षवेधी हवा निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकत अब्रू राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावली आहे. जिल्ह्यात युतीचे दोन खासदार आणि आठ आमदार असले तरी या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा सत्तारूढ युतीला धक्का देईल असे सांगण्यात येत आहे. पाहुयात आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा लेखाजोखा..

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘शिवसेने’ने जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकल्या होत्या. ‘भाजपा’बरोबरील युतीत शिवसेनेला विद्यमान सहा आमदारांसह आठ जागा मिळाल्या आहेत. मात्र विविध कारणांमुळे या पक्षाचे किमान चार ते पाच विद्यमान आमदार सद्य स्थितीत ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य दोन मतदारसंघातही सेनेच्या उमेदवारांना अंतिम टप्प्यात मोठा संघर्ष करावा लागतो आहे. युतीच्या जागा वाटपात राज्यात मोठा भाऊ असलेल्या ‘भाजपा’च्या वाट्याला जिल्ह्यात केवळ दोन जागा आल्या आहेत. यापैकी एका मतदारसंघात काँग्रेसच्या तर दुसऱ्या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे दोन्ही जागा राखण्यासाठी ‘भाजपा’ला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील अशी परिस्थिती आहे.

२०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची पाटी कोरी राहिली होती. यावेळी मात्र कोल्हापूर शहर परिघातील किमान जवळजवळच्या तीन मतदारसंघात काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. बहुरंगी लढतीमुळे चौथ्या मतदारसंघातही काँग्रेस जोरदार टक्कर देऊ शकतो. जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले होते. यंदा देखील त्यांची तीच संख्या कायम राहू शकते असे सांगण्यात येत आहे. मात्र एका मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला अपक्ष उमेदवाराकडून जोरदार टक्कर देण्यात येत आहे. मात्र शेजारच्या मतदारसंघात हि टक्कर कमी पडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक बंडखोर उमेदवारही विजयाच्या शर्यतीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे पक्षाध्यक्षांसह उमेदवारांसाठी ही अस्तित्वासाठी लढत आहे. ‘भाजपा’कडून दत्तक मिळालेले दोन उमेदवार या पक्षाच्या चिन्हावर चांगली टक्कर देत आहेत. त्यामुळे ही निवडणूक जनसुराज्य पक्षाला संजिवनी देणारी ठरेल असा विश्वास या पक्षाच्या गोटातून व्यक्त करण्यात येतो आहे.

गेली पाच वर्षे विधानसभा लढवायचीच या एकमेव उद्देशाने ‘भाजपा’मध्ये सामील झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेशी युती झाल्याने कोंडी झालेल्या दोन उमेदवारांनी जनसुराज्यचा नारळ हातात घेतला आहे. तर पूर्वाश्रमीचे ‘भाजपा’मध्ये असलेले किमान तीन उमेदवार अपक्ष म्हणून लढत आहेत. त्यापैकी किमान दोघांना विजयाची आशा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात युतीचे दोन खासदार आणि आठ आमदार आहेत. कागदावर युती भक्कम दिसत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यात ‘युती’ जिंकणार का ‘आघाडी’ जिंकणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.