कोल्हापूरात अतिक्रमण काढल्याच्या रागातून एकाने पोलीस निरीक्षकाचे घर पेटवले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरात पोलीस कर्मचारी निवासस्थानातील अतिक्रमण काढल्याच्या रागातून भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे राहते घर आणि चार चाकी गाडी पेटविण्याचा प्रकार गारगोटीत घडला. या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखयांनी दिली आहे.

भुदरगड पोलिस निवासस्थान हद्दीत सुभाष देसाईने अतिक्रमण करून दुकान गाळा काढला होता. ते अतिक्रमण पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी काढले. त्याचा राग मनात ठेवून सुभाष देसाईने पतंगे यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री सुभाषने पतंगे यांच्या निवासस्थानासमोरील गाडी रॉकेल ओतून पेटवली. बाहेरील आवाज ऐकून पतंगे बाहेर येऊन सुभाषला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पतंगे यांची गाडी पूर्णत: पेटली असून फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. घराच्या हॉलच्या काचा फोडून ज्वाला आत गेल्याने संपूर्ण हॉलमधील साहित्यास आगीच्या झळा लागून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी संशयित आरोपी सुभाष देसाईला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना घडण्यापूर्वी काही मिनिटे आधीच उपविभागीय अधिकारी अंगद जाधव गस्तीवरून परत गेले होते. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय अधिकारी अंगद जाधव,स्थानिक गुन्हा अन्वेषण निरीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक उदय डुबल यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा गारगोटीत दाखल झाला. गडहिंग्लज तालुक्यातील महागाव इथून सुभाष देसाईस बहिणीच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment