कोल्हापूरात लोकशाही दिनाला प्रचंड प्रतिसाद; सामान्यांची अनेक कामे मार्गी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या लोकशाही दिनातून आपले प्रश्न सोडवून घेण्याच्या उद्देशाने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी गर्दी केली होती. सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याबरोबर त्यांच्या निराकरणासंबंधिचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले. गावा-गावातून आलेल्या नागरिकांच्या प्रश्न आणि समस्यांबाबत निवेदने पालकमंत्र्यांनी स्वीकारली. खासदार धैर्यशिल माने, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणांनी सामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेऊन त्यांना सहाय्यभूत होण्याची भूमिका जोपासावी, अशी सूचना करुन पालकमंत्री म्हणाले, लोकशाही दिनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटण्यास मोलाची मदत होत आहे. या उपक्रमातून सामान्य माणसाला दिलासा मिळत आहे. यापुढे लोकशाही दिनात येणाऱ्या अर्जाची सोपस्कार म्हणून निर्गती करु नका, तर तो प्रश्न पूर्णपणे सुटावा आणि त्याचे समाधान सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर दिसावे, या दृष्टिने सामान्य माणसाचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. सामान्य माणसाचे प्रश्न मनापासून सोडवा, त्यांना हेलपाटे मारायला लावू नका, असे स्पष्ट निर्देश देवून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत, यासाठी सर्व यंत्रणातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरुन जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावीत. लहान-सहान प्रश्नांसाठी त्यांना जिल्हा मुख्यालयात यायला लागू नये.

गेल्या दहा पंधरावर्षापासून प्रलंबित असलेले कित्येक प्रश्न या लोकशाही दिनात अनेकजणांनी मांडले. अशा प्रलंबित प्रश्नांचा अधिकाऱ्यांनी अभ्यास करुन योग्य मार्ग काढून असे प्रश्न स्वत: पुढाकार घेऊन त्यांची सोडवणूक करावी. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी. गेल्या व आत्ताच्या लोकशाही दिनात एका तलाठ्याच्या कामाविषयी गंभीरता निदर्शनास आल्यावर संबंधित तलाठ्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शिक्षण विभाग आणि सीपीआर हॉस्पीटलकडील वैद्यकीय बिलांबाबत आजच्या लोकशाही दिनात तक्रारी आल्याने या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करुन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

सुमारे 615 अर्ज/निवेदने दाखल झाली. या निवेदने आणि तक्रारींचा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ निपटारा करावा, नियमात असतील ती सर्व कामे तात्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. आजचा लोकशाही दिन सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाला, सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागातील आलेल्या नागरिकांनी गर्दी केली. आजच्या लोकशाही दिनात महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महापालिका, बांधकाम विभाग, पाटबंधारे, पुरवठा विभाग, क्रीडा विभाग, विद्युत वितरण कंपनी, जिल्हा उपनिबंधक, शिक्षण, आरोग्य, कामगार, नगर रचना, कृषी यासह अनेक विभागांच्या संबंधातील निवेदनाबरोबरच वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचाही समावेश होता. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गेल्या महिनापासून सुरु झालेल्या लोकशाही दिन उपक्रमास जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्याच्या लोकशाही दिनात 890 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी यंत्रणांच्या माध्यमातून 809 अर्जाची निर्गती करण्यात आली तर 81 अर्ज विविध कारणांनी प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्जही प्राधान्यक्रमाने निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

आजच्या लोकशाही दिनास पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुर्वे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, प्रातांधिकारी वैभव नावडकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, कार्यकारी अभियंत संजय सोनवणे, तुषार बुरुड, प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment