कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्ताने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. नेहमी दंड लावूनही अनेक वाहन चालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलिस आता गांधीगरी करताना दिसत आहेत. जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात, त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहेत. तर जे नियम पाळत नाही त्यांनी नियमावलीचे पत्रक देत कायदा पाळण्याचे आवाहन शहरातील विविध सिग्नलवर पोलीस देत आहेत.
रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बेशिस्त वाहनधारकांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. चुकांबद्दल वाहनधारकांना दंड करण्याऐवजी त्यांना फुले देऊन सर्वांसमोर सत्कार केला जात आहे. या उपक्रमातून खजिल होऊन वाहनधारक नियमांचे पालन करतील, अशी अपेक्षा शहर वाहतूक नियंत्रण शाखेला वाटत आहे.
मोहिमेबाबत अधिक माहिती देताना कोल्हापूर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शामराव देवणे सांगतात,” रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. दंडात्मक कारवाईनंतरही अनेक वाहनधारकांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.” शहरातील कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर आणि सीपीआर चौकात शालेय विद्यार्थिनींसह पोलिसांनी ट्रॅफिक सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर थांबणाऱ्या वाहनधारकांना गुलाबाची फुले देऊन त्यांची चूक दाखवून दिली.