धक्कादायक ! कोल्हापूरमध्ये महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. योगिनी पवार असे या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृत योगिनी पवार या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगिनी सुकुमार पवार या कसबा बावडा येथे असलेल्या पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास होत्या. या ठिकाणी त्या आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. कौटुंबिक वादातून आणि पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोटदेखील आढळून आली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले ?
मृत योगिनी सुकुमार पवार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. ही चिठ्ठी त्यांच्या घरात आढळून आली आहे. आपल्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसानी योगिनी पवार यांच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.