सातारा प्रतिनिधी | प्रदिप देशमुख
कोरेगाव-पुसेगाव रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम अनेक महिने रखडले आहे. यामुळे संतप्त झालेल्या कोरेगाव पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी आज निवेदनाद्वारे आपल्या व्यथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना कळविल्या.
राज्यातील महत्वाच्या सातारा- सोलापूर राज्यामहामार्गाची दुरावस्था झाली आहे. कोरेगाव पासून पुढे दहिवडीपर्यंतचा मार्ग अत्यंत खराब झाला असल्यामुळे स्थानिकांसोबत बाहेरच्या लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शेतमालाचा, दुधाचा पुरवठा करण्यासाठी दररोज अनेक वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. शाळा-महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थीही शिक्षणानिमित्त या रस्त्यावरुन प्रवास करतात. असं असूनही गेल्या वर्षभरात या ठिकाणी रस्ता दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मागील काही दिवसांत अपघाताचे, शारीरिक समस्या उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊनच पुरुषोत्तम माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज निवेदन दिले. या कामाशी निगडित मे. मेघा इंजिनियर्स या कंपनीच्या ठेकेदारावरही कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
‘रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून अजूनही काम होत नसेल तर सातत्यपूर्ण चर्चा घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिलं.’ किमान अर्धा रस्ता तरी वाहतुकीसाठी तातडीने उपलब्ध करुन देता येईल यावर लक्ष ठेवलं जाईल असंही त्या पुढे म्हणाल्या. यावेळी खटाव-कोरेगाव-सातारा विकास आघाडीचे पुरुषोत्तम माने, कोरेगाव तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रविंद्र माने, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे, कोरेगाव खरेदी विक्री संघाचे संचालक जयवंत निकम, अमित सावंत व इतर सहकारी उपस्थित होते.