सातारा प्रतिनिधी । कोयना धरण आणि भूकंप याचा नैसर्गिक अथवा तांत्रिक संबंध नसला तरी या विभागात सातत्याने होणार्या भूकंपामुळे हा तालुका भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या ठिकाणी वारंवार भूकंपाची मालिका सुरु असते. मात्र एका भूकंपाने तेथील जनतेचे आयुष्य बदलून टाकले होते. त्याच विनाशकारी भूकंपाला आज ५२ वर्षे पूर्ण झाली. ११ डिसेंबर १९६७ ला कोयनेला तब्बल ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता.
एवढ्या वर्षांनंतरही त्या विनाशकारी भूकंपातील आठवणी आजही ताज्या आहेत. या भूकंपात शेकडोंना आपला जीव गमवावा लागला होता. तर हजारोंच्या संख्येने संसार उद्ध्वस्त झाले होते. या भूकंपात आपल्या सर्वस्वाची राखरांगोळी झालेल्या हजारो कुटुंबीयांच्या पुढच्या पिढीवर देखील याचे परिणाम जाणवतात.
या विभागात सातत्याने होणार्या भूकंपामुळे हा तालुका भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे निश्चितच येथे औद्योगिक विकासाला जागेवरच पायबंद बसले. तर ११ डिसेंबर १९६७ च्या विनाशकारी भूकंपाच्या अगोदर कोयनेची सार्वत्रिक स्थिती ही देशभरातील एक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण अशी होती. त्या भूकंपाने कोयनेचे सार्वत्रिक वैभव कायमचे हिरावून घेतले. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनावर या घटना तशाच ताज्या आहेत. दरम्यान एवढ्या वर्षांनंतर देखील आगामी काळात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जावीत एवढी अपेक्षा येथील नागरिक अजूनही व्यक्त करत आहेत.