बॉम्बच्या अफवेनंतर साताऱ्यात कोयना एक्स्प्रेस थांबवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बुधवारी दुपारी कोयना एक्सप्रेस रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याचा फोन सातारा पोलिस मुख्यालयात आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये रेल्वे स्टेशनवर धाव घेवून रेल्वे थांबवली. बॉम्ब शोधक पथकाद्वारे रेल्वेमध्ये तपासणीला सुरुवात केली असता त्यामध्ये काहीही सापडले नाही. दरम्यान, या घटनेने प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली असून पोलिसांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी दुपारी कोल्हापूर – मुंबई या कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलिस मुख्यालयातील कंट्रोलरुममध्ये आला. पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी तत्काळ स्वत:सह पोलिस अधिकार्‍यांसोबत सातार्‍यातील माहुली रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. सातार्‍यातील बहुतेक पोलिसांना फोन करुन रेल्वे स्टेशनवर पोहचण्याचे आदेश झाल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले. तोपर्यंत बॉम्ब शोधक पथक, डॉग स्कॉड यासह पोलिस कर्मचार्‍यांचा फौजफाटा रेल्वे स्टेशनवर आला.

कोयना एक्सप्रेस मुंबईहून सातार्‍यात ४ वाजता आल्यानंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. पोलिसांच्या या आदेशामुळे प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्व रेल्वेची तपासणी करण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास तपासणी केल्यानंतरही त्यामध्ये आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. एक तास तपासणी केल्यानंतर सर्व प्रवाशांना रेल्वे मध्ये बसवण्यात आले व रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने गेली.

Leave a Comment