कोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी लाईफलाईन ; तुमचा काय अनुभव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र सफरनामा । कोयना एक्स्प्रेस एक अविस्मरणीय सफर..

ए.. चल लवकर नाहीतर परत कोयना मिळायची नाय.. ती काय यस्टीये का एक चुकली की दुसरी मिळायला.. चल चल लवकर आवर..ए आरं बॅगा घेतल्या का.. आणि पोती नीट ठेव.. अन जनरलचं तिकिटय तर पोती वर ठेऊ नको. पोत्यावच बस.. फलाटावर कोण ना कोण करतच मदत पोती आत घ्यायला..तेवढ्यात बाहेर दुचाकीवरुन यांना सोडायला निघालेले दोन मित्र म्हणतात.. ओ चला नायतर मधेच फाटक लागल्याव परत दहा मिनट तिथच जायची.. लका काय चाललय..इतका वेळ लावत्यात का..चला उरका पटापट पटापट. असं म्हणत, गडबड करत..कोयनेनं मुंबईला जाणार्यांची ही घरातुन निघतानाची नेहमीची घाई.. कोयना एक्सप्रेस.. कोल्हापुर ते मुंबई असा रुट असणारी.. कित्येक वर्षापासुन कित्येकांच्या सेवेसाठी अखंड धावणारी. जसं तालुक्याला,जिल्ह्याला जायला वडाप, यस्टी असते, पुरणपोळीला आमटी लागते, मटनाच्या रश्श्याला बाजरीची भाकरी लागते, तशी पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईला असणार्यां लोकांसाठी कोयना एक्सप्रेस असते..

कोल्हापुरातुन गाडी निघाली की वळीवडे, रुकडी हातकणंगले,जयसिंगपुर,मिरज,सांगली,भिलवडी, किर्लोस्करवाडी,ताकारी कराड, मसुर, तारगाव,कोरेगाव,वाठार, आर्दकीचा घाट ओलांडत, पुढे लोणंद निरा, जेजुरी करत, पुण्याहुन मुंबईकडे प्रस्थान करणार्या कोयना एक्सप्रेस चे सातारा, कोल्हापुर, सांगली,पुणे जिल्ह्यातील कित्येक मुंबईस्थायिकांचे या एक्सप्रेस शी भावनिक नाते आहे. एसटी, ट्रॅव्हल्स चा प्रवास परवडत नसल्याने कित्येक जण आज ही कोयनेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. गावापासुन रेल्वे स्टेशन लांब असल्यावर सकाळचं लवकर आवरुन तयार होतं आदल्या दोन तीन दिवस आधीच कुणाला तरी तिथपर्यंत सोडायला तयार करण्यापासुन ते रेल्वेत पोती,बॅगा ठेवण्यापर्यंत होणारी धांदल हा खरंतर वेगळाच विषय.

एकदा का मिनिटभर कोयना लवकर गेली तर तिकिट ही गेलं.अन दिवस ही वाया गेला अशी अवस्था होते. अनेकांची तर कोयना निघालीये. आणि यांची दुचाकी रेल्वे गेटजवळच आहे. कोयनेने हॉर्न ही दिलाय. हळुहळु ती निघालीये पाहताच सोडायला आलेल्या दुचाकीवाल्यानं रेस पिळत गाडी स्टेशनावरुन प्लॅटफॉर्मपाशी नेत सोबतच्या माणसाला धावत पळत कोयनेत बसवलंय..आतल्या माणसांनी ही त्यांना हात देत आत ओढत ओळख ना पाळख मदत करण्याचं काम कोयनेत नेहमी होत आलय..आणि गाडीत जाताच त्या व्यक्तीने दारातुन केलेला हात सोडायला आलेल्या माणसाला वेगळाच आनंद आणि रुखरुख देऊन जातो.वाठार स्टेशनसारख्या भागात तर कोयनेला बसायला येणार्यांची संख्या भरपुर आहे. तिकडुन वाई, इकडुन कोरेगाव अन पंचक्रोशी वेगळीच.. या भागातले कितीतरी लोक वर्षानुवर्षे मुंबईत कामाला असतात. त्यामुळे त्यांना कोयना एक्सप्रेस ही जवळची वाटते.

म्हणजे बघा ना की एक अशी व्यक्ती जी गेली वीस वर्षे कोयना एक्सप्रेसचा प्रवास करतेय. एस आर 4 मधे सीट नंबर 24 वर बसतेय.. अन त्या व्यक्तीला योगायोगाने त्याच नंबरची तीच सीट कितीतरी वेळा नकळत बुकिंग करताना मिळालीये.. आहे की नाही गंम्मत. मुलाच्या बारशाला तो गावाला आल्यावर त्याला त्याच नंबरची सीट मिळाली होती. अन परत गावाहुन मुंबईला जाताना ही त्याच नंबरची सीट मिळाल्याचे किस्से ही कोयनेत घडले आहेत.

दरवर्षी गावाला कोयनेनं यायचं.अन परत पुण्या मुंबईला कोयनेनेच जायचं.असं रुटिन अनेकांचे कितीतरी वर्षापासुन आहे. आम्ही गावाहुन मुंबईला किंवा मुंबईहुन गावाला एस्टीचा प्रवास कधीच नाही केला वीस पंचवीस वर्षात…असं अभिमानाने म्हणणारी माणसं ही आहेत. मुंबईची जशी लोकल. तशी पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी कोयना एक्सप्रेस..असं समीकरणच आहे.

पंचगंगेचा पुल ओलांडत कोयना कोल्हापुर सोडते ते हळुहळु एकेक जिल्हा मागे टाकत पुढे सरकते. यात पण एक वेगळी मजा म्हणजे..कोल्हापुरात बसलेल्या माणसाला पुढे सांगली सातारा व पुणे जिल्ह्यातील लोक भेटले की त्या गप्पात तीन ही भागातल्या भाषेची ओळख एकमेकांना होते. तंबाखुच्या पुडी अन चुन्याच्या डबीतुन गप्पा रंगत रंगत पुढे सकाळी लवकर बनवलेला डबा दुपारी उघडत समोर बसलेल्या अनोळखी व्यक्तीला ही त्यात सामिल करत जेवतानाचा आनंद कोयनेत मिळतो. अहो नुसतं जेवणच नाही तर हळुहळु गाडी सातारकडं वळली की मग नुसती ही गर्दी.. कोण वाईच, कोण कराडचं, कोण सातारचं कोण कोरेगाव तालुक्यातलं..कुठना कुठं तरी बोलताना गप्पातनं ओळख निघत पुढे त्यातल्या कित्येकांची लग्न ही कोयनेत जमली आहेत.धदक धदक..ततक ततक आवाज करत हळुहळु गाडी स्टेशनं घेत वेग पकडते तेव्हा बसुन अवघडलेले मग गप्पांचा फड रंगवतात. त्यात वरच्या फ्लोर ला एखादा जेवत असला तर त्याचं कालवण चुकुन खाली सांडलं की समजायचं त्यानं बोलणी खाल्लीच..

पुर्वी मोबाईल जास्त नव्हते तेव्हा कोयना म्हणजे गावची जत्राच.किलकिलाट नुसता. गप्पांना अंत नाही. मुंबई स्थित असणार्या अनेकांनी आपली नवी राहती घरे गावाकडं वर्षातुन दोन तीन दा कोयनेनं लवकर जाता येता याव म्हणुन कोयना जिथुन जाते त्या स्टेशनच्या आसपास त्यांनी खरेदी केली आहेत. विविध भागांतुन आलेल्या बोलीभाषेसोबत, डब्यांमधल्या भाजीची चव ही जशी वेगळी..तशीच कोयनेनं जाणार्या प्रत्येक भागातली माणसं ही विविध ढंगाची. कोणं रांगड,कोण मवाळ,कोण फणसासारखं, तर कोण रोखठोक.

कोयनेचा जनरल डबा पाहिला तर एखादा रेल्वेने प्रवास न करणारा माणुस चार पावलं मागं सरेल. पाय ठेवायला जागा नाही. सीटवर तर आहेतच पण वाटेत ही पोती, बॅगा, अन त्यावर माणसं बसलेली असतात. दारात तरुणाई एंजॉय करत असते.बोगदे आले की जोरात ओरडणे..कॉमेडी करणे..हे आलच….गाडी हळुहळु आदर्कीचा घाट ओलांडते तेव्हा कोयनेतली लोक जरा निवांत होतात. अन नीरेच्या प्लॅटफॉर्मवरील अंजिराची वाट पाहत राहतात. नीरेच्या स्टेशनावर मिळणारं अंजीर अन कर्जतच्या स्टेशनचा वडापाव ह्या दोन गोष्टी कोयनेतल्या प्रवाशांसाठी सुखच..कर्जतला एकदा वडापाव घेतला की त्या पुढचा घाट वडापाव खात खात बघणे हे नेहमीचच..चाय चाय,कॉफी म्हणत डब्यातुन फिरणार्यांची धांदल ही नित्याचीच. कोल्हापुराहुन निघालेले बरेचसे लोक किर्लोस्करवाडीत थांबतात. भिलवडीत येतात. पण कराड पासुन पुढचे बरेचसे लोक हे थेट मुंबईलाच पोचतात.

वाईपासुन रेल्वे पंचवीस किलोमीटर असली तरी निम्मा वाई तालुका वाठार स्टेशनला कोयनेचं तिकिट बुक करतो. बरेचसे लोक तर आवर्जुन फिल घ्यावा म्हणुन कोयनेचा तिकिट बुक करत निवांत मुंबईला पोहोचतात. दोन चार दिवस पाहुण्याकडं थांबुन मुंबई बघून पुन्हा कोयनेनं रिटर्न. कितीतरी एक्सप्रेस कोयनेला ओव्हरटेक करतात. कधी समोरुन येतात. पण ही मात्र तिच्याच नादात. का काय माहित पण कोयना एक्सप्रेस एका वयस्कर व्यक्तीसारखी वाटते. सगळ्यांची विचारपुस करत पुढे जाणारी. नाही म्हणायला दोन तीन एसी चे डबे कोयनेला आहेत की.. पण कोयनेसारख्या गाडीला एसी डबा नसता तरी काय बिघडलं नसतं. उलट गाडीच्या आवाजा इतकाच आतल्या लोकांच्या गप्पांचा फड अधिक रंगला असता. लोणंदची वारी असो..की कुठली आंदोलनं..पंचगंगेचा पुर असो की रेल रोको.. कोयनेनं काय काय नाही पाहिलं.. पण त्यातुन ही ती पुढे निघाली.पुढे जात राहिली.

फौजींची तर ही आवडती ट्रेन. मुंबईतुन विमानाच तिकिट बुक असलं तरी बस ने न जाता कोयनेनं जाणारे कितीतरी फौजी आज ही आहेत. कोयनेनं माणसं जोडली. संवाद घडवले.. नाती जपली.. कुणाची लग्न ठरली..सोयरिक जुळली.. या वर्षीचा माणुस पुढल्या वर्षी दिसला नाही म्हणुन त्याला शोधताच..अहो ते गेले हे कळताच हळहळणारी माणसे ही या कोयनेनं पाहिली.

सातारचं जाधव पाव्हणं आता दिसत नाहीत हो गेली दोन वर्ष. दोन ट्रिपा झाल्या गावाला. पण दिसलं नाहीत. अहो ते आता गावाकडच स्थायिक झालं. कुणीतरी सांगतं. तालुक्याच्या ठिकाणी जसं कोण ना कोण ओळखीच भेटतं तस वर्षभराने ही कोयनेच्या डब्यात ही कोण ना कोण ओळखीचे चेहरे दिसतात. मग त्यांना लांबुनच हात केला जातो.किंवा कुठतरी पाह्यलय असं तरी वाटतं. दिवाळी,उन्हाळी सुट्टीच्या काळात कोयना अधिक गजबजते. जशी येताना गर्दी असते. त्याहुन जास्त जाताना चाकरमान्यांची गर्दी राहते.स्टेशनं बदलत,माणस उतरत,चढत आपल्या सोबत नेत ही मध्य रेल अनेकांचा मध्य साधत, भार हलका करत थांबत राहते.पुढे जात राहते. रोजचा 518 किलोमीटरचा प्रवास.. हजारो माणसं ने आण करत तिने तिचं अस्तित्व कित्येक वर्षानंतर ही अबाधित ठेवलय. बसुन बसुन गुळगुळीत झालेल्या डब्यातल्या बाकड्यांसह त्या बाकड्याचा ही गुळगुळीत झालेला कोपरा, खिडकीपाशी आधाराला हात ठेऊन उडालेला तिचा रंग, डोकं टेकुन टेकुन तेलाचा पसरलेला थर..हे सगळं कोयनेतल्या गर्दीची व्याख्या नव्यानं सांगतं..

कोयनेत बसणारे लोक, त्यांना जिथे जायचय, थांबायचय तिथं जात राहतील.थांबत राहतील.पण कोयनेशी त्यांच असलेलं नातं मात्र कित्येक वर्ष अबाधित राहील हे मात्र नक्की. पूर्वी मोबाईल नव्हते म्हणुन लोकं कोयनेत गप्पा मारत बसायची..आता मोबाईल असले तरी लोक कोयनेत गप्पा मारत राहतात. हेच महत्वाचं नाही का. कोरोनाच्या या काळात ही कोयना आता पुन्हा धावतेय. गर्दी थोडी कमी आहे. पण हो.. कोयना पुन्हा गजबजेल..पहिल्यासारखी..
वाट पाहिन..पण कोयनेनेच जाईन असं म्हणणार्या अनेकांसाठी..

विकी पिसाळ
9762511636

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in