सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सर्वत्र उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पूर्वेकडील भागात पिण्यासाठी टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून कोयनेचे पाणी पुरविले जात आहे. पाणीसाठा 45.89 टीएमसी आहे. पूर्वेकडे दुष्काळामुळे पिडीत जनतेला दिलासा देण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पायथा विजगृहातून 2100 क्युसेक्स आणि नदी विमोचका (river sluice) मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 3100 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे, कृष्णा पाणी वाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला अजून 35 दिवस शिल्लक बाकी आहेत. सध्या कोयना धरणात 45 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर पूर्ण क्षमता वीजनिर्मिती अखंडित सुरु आहे.
महाराष्ट्राचे वरदायिनी समजले जाणारे कोयना धरणावर राज्याची वीज आणि तहान या दोन्ही गरजा भागविल्या जातात त्यामुळे या कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. धरणाच्या पाण्यापासून सुमारे 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर 30 टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणी वाटप करारानुसार 1 जून ते 31 मे दरम्यानच्या काळात हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील तब्बल 10 महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला असून आता केवळ 35 दिवस बाकी आहेत.
सध्या धरणात 45.89 टि. एम.सी.इतका मुबलक व समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे चालू वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागूनही आगामी नवीन तांत्रिक वर्षारंभाला येथे आवश्यक पाणीसाठा शिल्लक राहील अशी स्थिती आहे. या पाण्यावर अखंडित वीजनिर्मिती सुरू असून नवीन तांत्रिक वर्षात जरी जून अखेर पाऊस पडला नाही तरी वीजनिर्मिती शक्य होणार आहे.