कोयना- कृष्णा नदीत पोहणाऱ्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील कृष्णा- कोयना नदीच्या संगम झालेल्या ठिकाणी पोहणाऱ्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मगरीच्या हल्यात मधुकर थोरात ही व्यक्ती जखमी झाली आहे. मगरीने पकडलेल्या पायाला जखम झाली असून मित्रांच्या मदतीने श्री. थोरात यांना नदीतून बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील प्रितीसंगमावर आज (दि. 4) शुक्रवारी सकाळी पोहायला गेलेल्या सोमवार पेठेतील मधुकर थोरात यांच्यावर पोहताना मगरीने अचानक हल्ला केला. नदीत जॅकवेल जवळ पोहत असताना, मगरीने मधुकर थोरात यांचा पाय पकडला होता. पाय पकडल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाडसाने मगरीला आरडाअोरडा केला. तसेच मगरीला झटका देऊन पाय सोडवून ते काठावर आले. त्यांच्या पायाला मोठी जखम झाली असून त्यांना पोहणाऱ्या लोकांनी तात्काळ कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मगरीच्या या हल्ल्यामुळे कराड व परिसरात खळबळ उडाली आहे. प्रीतीसंगमावर मगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या काही दिवसात प्रीतीसंगमापासून काही अंतरावर गोटे व सैदापूरच्या ग्रामस्थांना मगरीने दर्शन दिले होते. यापुढे प्रीतीसंगमावर पोहायला जाणाऱ्यांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. आटके, टेंभू, खोडशी, गोटे, सैदापूर नंतर आता कराडच्या प्रीतीसंगमावर मगरीने मुक्काम ठोकला आहे.