हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात वरूणराजा बरसत असून शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात सुद्धा मोठा पाऊस सुरु आहे. पावसाची बॅटिंग अजूनही सुरु असून त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ (Koyna Dam Water Storage) झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे.
23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक- Koyna Dam Water Storage
कोयना धरण हे 105 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. महाराष्ट्रासाठी हे धरण म्हणजे एकप्रकारचे वरदान आहे. सध्या कोयना धरणात 21000 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु असून 23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. साताऱ्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जर असाच पाऊस सुरु राहिला तर कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ (Koyna Dam Water Storage) होऊ शकते. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्याच्या कोकण पट्ट्यासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसासाठी चांगली परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर वाढताना दिसेल. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात सुद्धा तब्बल 21 दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.