हॅलो महाराष्ट ऑनलाईन Koyna Dam Water Storage । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असला तरी आज शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मागच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ९८ तर महाबळेश्वरला ९४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण पाणीसाठ्यात जवळपास साडेचार टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा ३२ टीएमसीवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाने नुकसान वाढू लागले आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, तर कोठे रस्त्यावर मातीचा भराव वाहून आला आहे. यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. त्यातच पश्चिम भागात कास, बामणोली, कांदाटी खोरे, नवजा, कोयनानगर भागात संततधार पाऊस आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली आहे.
यावर्षी पावसाळ्यात प्रथमच कोयना धरणातून शुक्रवारी पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच नदीकाठच्या रहिवाशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शनिवारी काहीशी पावसाने विश्रांती दिली असल्याने सूर्यदर्शन पहायला मिळाले. मात्र काल शुक्रवारी दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने कमी हजेरी लावली होती. दरम्यान, कोयना धरणाची पाणी पातळी (Koyna Dam Water Storage) नियंत्रित करणेसाठी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा– Koyna Dam Water Storage
कोयना धरणातून शुक्रवारी कोयना नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे कोयना-कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 33.56 TMC इतका पाणीसाठा झाला होता.




