सातारा | वाई शहरातून कृष्णा नदी वाहत असते. या कृष्णा नदीवर असलेल्या घाट आणि पौराणिक मंदिरामुळे वाई शहरास दक्षिण काशी संबोधले जाते. या शहरातील ब्रिटीश कालीन 135 वर्षे जुना कृष्णा पूल आज शुक्रवारी दि. 19 पासून तो पाडण्यात येणार आहे. त्यामुळे शतकाहून अधिक काळ असलेला साक्षीदार इतिहासजमा होणार आहे.
वाई शहातील कृष्णा पूल 1884 साली ब्रिटीशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला 135 वर्षे पुर्ण झाली. पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1984 साली ब्रिटीश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्या बाबतीत पत्र पाठवले होते. शहराची लोकसंख्या वाढलेली असून या पूलावरून ये- जा करताना वाहतूकीची कोंडीचा विषय नेहमीचाच बनला आहे. त्यामुळे याठिकाणी एक नवीन सक्षम व मोठा पूल उभारण्याची मागणी केली जात होती.
तसेच नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी दिली. नवीन तंत्रज्ञानाने युक्त 15 कोटींचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर केला. नवीन प्रशस्त पूल तयार होत असल्यामुळे वाईकरांमध्ये आनंद आहे. मात्र अनेक वर्षाचा ऐतिहासिक वारसा असलेला कृष्णा पूल इतिहासजमा होणार असल्याने नागरिक आठवणींना उजाळा देत आहेत.
वाई भागात पावसाचे प्रमाण मोठे असल्याने पावसाळ्यात या नदीला पूर हा नेहमीचाच पहायला मिळतो. अशा परिस्थितीत कृष्णा पुलाने अनेक महाप्रचंड पूर झेलले आहेत. या पुलावर स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी, अनेक हिंदी, मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा साक्षीदारही हा पूल ठरला. अनेक संकटातही न डगमगता वाईच्या दोन्ही भागाचा दुवा बनला. आज हा इतिहासाचा साक्षीदार, मनोरंजना, सामाजिक, धार्मिक तसेच प्रत्येक वाईतील नागरिकांच्या आठवणीतील कृष्णा पूल अखेरचा प्रवास करत आहे.