कृष्णा कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्यावतीने हा पुरस्कार सप्टेंबरमध्ये पुणे येथे होणाऱ्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नेहमीच नवनवीन प्रयोग करत, शेतकरी सभासदांचे हीत साधले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी कारखान्याने राबविलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेसह विविध ऊसविकास योजनांचे यांचे सखोल व गुणात्मक परीक्षण करून, या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड, भारतातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे एकमेव संयुक्त व्यासपीठ असलेल्या भारतीय शुगर या संस्थेने केली आहे.

कृष्णा कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत गेल्या ६ वर्षात ११,९९९ शेतकरी सभासदांनी सहभाग घेऊन, हेक्टरी उत्पादकता सरासरी २० ते २५ मेट्रिक टनाने वाढविली आहे. कारखान्यामार्फत व्ही.एस.आय. पुणे येथे ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी ३०६ पुरुष सभासद व ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी ४७ सभासद महिलांना कारखान्याने संधी दिली आहे. कारखान्याने कृष्णा जिवाणू खत प्रकल्पातून आजअखेर १ लाख  ६३ हजार ७१८ लिटर जिवाणू खतांचे उत्पादन केले आहे. या प्रकल्पात १८ प्रकारची विविध जिवाणू खते, बुरशीनाशके, जैविक कीड नाशके, सूक्ष्मअन्नद्रव्ये व जैविक  उत्प्रेरके निर्माण करण्यात येतात. खोडकिडीचे नियंत्रण करणाऱ्या ट्रायकोकार्डची निर्मिती करणारा कृष्णा कारखाना महाराष्ट्रातील एकमेव व पहिला साखर कारखाना आहे.

कारखान्याने गांडूळ खत प्रकल्पात ६ वर्षांत ८९७ मेट्रीक टन गांडूळ खताचे उत्पादन केले आहे. तसेच १,२०,३०१ मेट्रीक टन लूज कंपोस्ट सभासदांच्या बांधावर पोहोच केले आहे. कारखान्याच्या ऊस रोप नर्सरीमधून ३३,७२,९५० शुद्ध व निरोगी ऊस रोपे तयार केलेली असून, या सर्व कार्याची नोंद घेत संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. भारतीय शुगरच्यावतीने पुणे येथे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित साखर परिषदेच्या वार्षिक पारितोषिक सोहळ्यात कृष्णा कारखान्यास हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.

कृष्णा कारखान्याकडून पुरस्कारांची हॅट्रीक ः- कृष्णा कारखान्याने विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत, सन २०१९-२० व सन २०२०-२१ या सलग दोन गळीत हंगामासाठी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे पुरस्कार पटकाविले आहेत. त्यानंतर यंदा कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी भारतीय शुगरकडून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने, कृष्णा कारखान्याने सलग ३ वर्षे पुरस्कार मिळवित हॅट्रीक साधली आहे.