कृष्णा कारखाना निवडणूक : मनोमिलनाचा निर्णय अंतिम टप्यात, दुरंगी की तिरंगी तीन दिवसात स्पष्ट होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक लढत दुरंगी की तिरंगी होणार याची उत्सुकता अंतिम टप्यात आलेली आहे. सातारा- सांगली जिल्ह्यातील मतदारांना लागलेली उत्सुकता येत्या तीन दिवसात संपुष्टात येणार की आशावाद टिकणार हे कळणार आहे. अविनाश मोहिते व  डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या मनोमिलनाचे अडलेले घोडे 3 जूनच्या आत संपवावे लागणार आहे. कारण अर्ज माघारीचा दिवस संपण्यापूर्वी निर्णय घ्यावा लागणार आहे, अन्यथा तिरंगी लढत ही निश्चित होणार आहे.

कारखान्यांच्या निवडणुकीत मनोमिलन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजीत कदम व जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी पुढाकार घेतला आहे. या पुढाकारातून अनेक बैठकाही झाल्या आहेत. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच शेवटीची तारीख 1 जून आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याची तयारी सध्या दोन्ही गटाकडून असल्याने अर्ज दाखल करण्याचा दिवस जावू नये म्हणून अर्ज दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्यातरी दोन्ही गट स्वबळाची भाषा करत मनोमिलनाची तयारी दाखवत आहेत. तेव्हा नक्की मनोमिलन होणार का याबाबत अद्यापही साशंकता आहे.

रयत पॅनलचे प्रमुख डॉ. माजी चेअरमन इंद्रजित मोहिते व संस्थापक पॅनलचे प्रमुख माजी चेअरमन अविनाश मोहिते या दोन्ही नेत्यांनी आपापल्या परीने सभासद मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटी घेण्याचे सत्र गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. एकत्रीकरणांचा डाव हा सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला शह देण्यासाठी आखला जात आहे. परंतु दोन्ही नेत्यांच्याकडून अटी, मुद्यावर एकमत होत नसल्यानेच मनोमिलन ताणले जात आहे. मात्र आता अर्ज माघारी घेण्याचा दिवस म्हणजे 3 जूनच्या आत काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे अथवा निर्णय होणार आहे. तेव्हा या शेवटच्या 3 दिवसांत तिरंगी की दुरंगी निवडणूक होणार हे कळणार आहे.

Leave a Comment