कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२०-२१ या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन २०० रूपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुढील आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
कोरोनाच्या संकट काळात कृष्णा कारखान्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिलाची रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पेरणी, खते खरेदीसह शेतीची अन्य कामे करण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. कृष्णा कारखान्याने सन २०२०-२१ च्या गळीत हंगामात १५४ दिवसांमध्ये १२ लाख १५ हजार १७ मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, १४ लाख ७६ हजार २०० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.७५ टक्के इतका राहिला आहे.
कृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकरी सभासदांना २६०० रूपयांचा पहिला हफ्ता अदा केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने एफआरपीचा दुसरा हफ्ता २०० रूपयांप्रमाणे देण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, ऊसबिलाची ही रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहेत. ही रक्कम वर्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांना उसबिलापोटी प्रतिटन एकूण २८०० रुपये प्राप्त होणार आहेत.