कृष्णा कारखाना : तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग देसाई व दिपक पाटील यांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग शंकर देसाई (रा. आणे, ता. कराड) आणि दिपक वसंतराव पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या नूतन तज्ज्ञ संचालकांचा सत्कार करण्यात आला.

कृष्णा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने 11 हजाराचे मताधिक्य मिळवून सर्व 21 जागांवर विजय संपादन केला. दरम्यान, कारखान्यांच्या नूतन संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग देसाई व दिपक पाटील यांची निवड करण्यात आली. श्रीरंग देसाई व दिपक पाटील या दोघांनीही कृष्णा कारखान्यात यापूर्वी माजी संचालक म्हणून काम पाहिले आहे. तसेच गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ ते सहकार, तसेच ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. या निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जयवंत मोरे, विलास भंडारे, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, बँक प्रतिनिधी शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, माजी संचालक पांडुरंग होनमाने, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक निवासराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.