कृष्णा कारखाना निवडणूक : दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद, चुरशीने मतदान; एकूण मतांच्या 73.25 टक्के मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी 148 मतदान केंद्रावरून एकूण 73.25 टक्के मतदान झाले. कारखाना निवडणुकीसाठी 47 हजार 145 सभासद मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यांच्यापैकी 34 हजार 532 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कारखाना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. एकूण 47 हजार 145 मतदारांपैकी सुमारे नऊ हजार मतदार मयत असल्याने टक्केवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात हयात मतदार विचारात घेतल्यास सुमारे 91 टक्के मतदान झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान प्रक्रियेला सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात झाली. सातारा, सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणार्‍या कृष्णा कारखान्यासाठी तिरंगी लढत होत असून सत्ताधारी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांचे पुत्र माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले गटाविरोधात विरोधी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेल उभा आहे.

सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला व सकाळी दहा पर्यंत सुमारे 21. 15 टक्के, दुपारी 12 पर्यंत 43. 59 टक्के, दुपारी 2 पर्यंत 59. 96 टक्के , दुपारी 4 पर्यंत 70. 67 टक्के व सायंकाळ 5 वाजेपर्यंत सुमारे 73.25 टक्के अशी एकूण मतदानाची टक्केवारी आहे. मतदानावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामाच्या ठिकाणी मतपेट्या आणण्याचे काम सुरु होते.

निवडणुकीसाठी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 500 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी कराड येथे वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ पासून 74 टेबलावर मतमोजणी होणार असून त्यासाठी सुमारे 325 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी फक्त प्राधिकृत केलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे.

Leave a Comment