कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चला जाणुया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नद्या अमृतवाहिनी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासन राबवित असलेल्या उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. कराड येथील प्रितीसंगम येथे कृष्णा नदी प्रणाली संवाद यात्रेचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी बोलत होते.
यावेळी चला जाणुया नदी अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक नरेंद्र चौघ, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, प्रांताधिकारी सुनिल गाढे सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, तहसीलदार विजय पवार, कार्यकारी अभियंता अशोक पवार, नदी समन्वयक बजरंग चौधरी, प्रदीप पाटणकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नदी सवांद यात्रा हा अभियानाचा दुसरा टप्पा होता. या दुसऱ्या टप्याचा समारोप उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर अहवाल तयार करुन शेवटच्या टप्प्यात शासनास अंतिम अहवाला सादर केला जाणार आहे.
नद्यांच्या प्रदूषणामुळे पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याची टंचाई जाणवते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर चला जाणुया नदीला उपक्रम राबविण्यात येत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये प्रशासनाने व नागरिकांनी पूर्ण क्षमतेने सहभागी होणे गरजेचे आहे. मुलांनी आपल्या पालकांना तसेच आजूबाजूच्या जेष्ठ नागरिकांना नदी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले पाहीजे, असेही ते म्हणाले.
नद्यांना पून्हा अमृत वाहिनी करणे गरजेचे असल्याचे सांगून राज्यस्तरीय समन्वयक श्री. चौघ म्हणाले, नदीचे आरोग्य उत्तम असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. नदीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सर्वांनीच योगदान दिले पाहीजे. नद्या प्रदूषण थांबविणे, नद्या स्वच्छ करणे व पून्हा प्रवाहित करणे यासाठी चला जाणुया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक टप्पा म्हणजे नदी संवाद यात्रा आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करणे व लोकसहभाग वाढविणे हे उद्दीष्ट सफल होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून जमा झालेली माहिती अहवाल स्वरुपात शासनास सादर केली जाणार आहे. नद्यांचे आरोग्य कशा प्रकारे सुधारले जाईल याविषयी कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावातील लोक, त्यांचे नदीसोबतचे जीवन व शासनाकडील माहिती यांचा एक सर्वसमावेशक असा अहवाल तयार होणार आहे. लोक व शासन मिळून नदी प्रदूषण रोखणे या उपक्रमाच्या माध्यमातून शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते कृष्णा, कोयना, वेण्णा, येरळा व माणगंगा या नद्यांच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्याहस्ते चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या अभियानाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही करण्यात आले. यावेळी एस. एम. इंग्लीश स्कूल व पालकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नदी प्रदूषण या विषयावर पथनाट्य सादर केले. यावेळी ढोल ताशे व झांज पथकाच्या गजरात प्रभात फेरीही काढण्यात आली.